अनेक उपाय करुनी फिरलो चारीधाम, नाही मिळाले कोठेच सुख समाधान... परमात्मा एक अनुभव
👉▶️ ▶ आजचा अनुभव :-
👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾
भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम !
महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !
!! परमात्मा एक !!
!! अनेक उपाय करुनी फिरलो चारीधाम, नाही मिळाले कोठेच सुख समाधान,!!
!! परमात्मा एक या मार्गात येताच, उंचावले कुटुंबाचे जीवन !!
माझे नाव :- 'विनायक रामचंद्रजी रोकडे' आहे. आज मी माझे
‘मार्गात येण्याचे कारण‘ *"मानवधर्म एकता परिवार" या व्हाट्सएफ ग्रुप& फेसबुक पेज ग्रुप तर्फे "अनुभव शृंखला " या मालिकेत सादर करीत आहे.
माझा जन्म एका दीन-दुःखी कुटुंबामध्ये झाला. आमच्या कुटुंबावर अंधश्रद्धा, गरिबी व दारिद्रीचे सावट पसरलेले होते. मी सव्वा वर्षांचा असताना, मुलं भुकेने व दारिद्रीमुळे मरून जातील म्हणून माझी मावशी मला तिच्या घरी घेऊन गेली. मावशीला मुल-बाळ नव्हती. माझे पालन-पोषण व शिक्षण मावशीकडेच झाले. मावसाजींना स्वतःचे मुल-बाळ नसल्यामुळे ते दारूच्या आहारी गेले होते. दारू पिऊन ते मावशीला मारझोड करीत व भांडत होते. त्यामध्ये ते मला सुद्धा मारत होते. माझी मावशी म्हणायची की, "ज्यांचे मुल आहे त्यांना ते काही जड नसतात, मी माझ्या बहिणीच्या मुलाला आणलं म्हणून तुम्ही भांडता व मारझोड करता, तर मी त्यांचा मुलगा त्यांच्या घरी नेऊन देते." मी पाचव्या वर्गात गेलो असताना मावशीने माझ्या आईकडे मला राजोली या गावी (तारसा रेल्वे स्टेशनच्या बाजूला) नेऊन दिले. मग मी तारसा या गावी सहाव्या वर्गात शिक्षण घेऊ लागलो. आई वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी मी आई सोबत शेतामध्ये मिरची, वांगे, टमाटर तोडायला रोज मजुरीने जात असे. अशामध्ये १९८३-८४ साली मी मॅट्रिक पास झालो व समोरचे शिक्षण बंद केले. गरिबीमुळे समोरचे शिक्षण घेणे शक्य नव्हते.
१९८४ पासून मी आई वडिलांसोबत माती गोट्याचे काम करायला लागलो. आम्ही ज्यांच्या शेतात माती गोट्याचे काम करीत होतो, त्यांचा मुलगा नागपूरला राहत होता. एके दिवशी तो गावाला आला. आम्ही त्यांच्याच शेतात बांध्यांना धुरे बनविण्याचे काम करीत होतो. त्यांचा मुलगा शेतात आला असता त्यांनी मला म्हटले की, "अरे, तू तर मॅट्रिक पास झाला आणि माती गोट्याचे काम करतो?" मी म्हटल की, "दादा, आम्ही गरिबांची पोरं, एवढंच शिक्षण आमच्यासाठी खूप झाल." तर त्यांनी मला म्हटले की, "जर तुझी इच्छा असेल की आपण अजून शिकायला पाहिजे, तर नागपूरला रात्र शाळा आहेत, तू दिवसा काम धंदा करून आपलं शिक्षण स्वतःच करत जा." मला त्यांचे विचार पटले व मी त्यांच्याकडे एक दिवस नागपूरला येऊन रात्र शाळेत, नागपूर नाईट कॉलेजला ऍडमिशन केली. मी दिवसा जे काम मिळाले ते करीत होतो व आपला उदरनिर्वाह चालवुन शिक्षण घेत होतो.
मग मी नागपूरला नंदनवन झोपडपट्टीत २५ रुपये किरायाची खोली करून राहायला लागलो. एक दिवस माझे वडील माझ्या खोलीवर आले व सांगायला लागले की, "तुझ्या आईची प्रकृती बरी राहत नाही आणि अमावस्या, पौर्णिमेला तिच्या अंगात येते, वैद्य-वाणी करून थकलो; पण आराम काही होत नाही व तुझ्या भावाला सुद्धा कोणी जाणत्यांनी फिट ची बिमारी लाऊन दिली, मी औषध-पाणी व वैद्यवाणी करून त्रासून गेलो आहे, आपल्या घरची परिस्थिती खुप खराब झाली आहे, काय करावे काही सुचत नाही!" तेव्हा मला खुप वाईट वाटले. मी माझ्या वडिलांना म्हटले की, "तुम्ही बाहेर बाधेवर विश्वास ठेवू नका व मला या गोष्टी सांगत जाऊ नका." मी आधीपासून बाहेर बाधेवर विश्वास ठेवत नव्हतो. तेव्हा माझे वडील म्हणाले की, "तुम्ही शिक्षणवाले पोरं आम्हाला कचरा समजता, तुझ्या आई व भावाच्या प्रकृतीमुळे मी बेजार झालो, घरी खायला अन्न नाही, भीक मागायची वेळ आली आणि तू असा म्हणतो." तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. मी खूप रडायला लागलो व म्हटलं की, "ठीक आहे, तुम्ही घाबरू नका, मी २-४ दिवसात गावाला पैसे घेऊन येतो." मग मी रात्री कॉलेज मधून आल्यावर रात्रीच्या वेळेला रिक्षा चालवत होतो. जे काम मिळेल, ते करीत होतो. उपाशी राहून घरच्या लोकांसाठी पैसा गोळा करीत होतो. एका मित्राने विचारले की, "पेपर वाटशील काय?" तर मी पटकन हो म्हटलं, कारण मला पैसे गोळा करायचे होते. मी १९८९ मध्ये पेपर वाटायचे काम १५० रुपये महिन्यांनी सुरु केले व १९९० ला स्वतःची १८ पेपरची लाईन तयार केली. माझा स्वभाव व काम करण्याची जिद्द पाहून मला लोकांनी खूप सहकार्य केले. माझी पेपरची लाईन दोन महिन्यात १३० झाली. असे करता करता २५० पेपरची लाईन झाली व या धंदयातून मला चांगली मिळकत मिळत होती.
परंतु माझ्या घरच्या लोकांचे दुःख वाढतच गेले. मी सुद्धा त्यांना नेहमी पैसे पाठवत होतो; पण त्यांना बाहेरची भूतबाधा असल्यामुळे पैसा काही पुरत नव्हता. एका मागून एक दिवस जात होते; पण दुःख दूर होत नव्हते. अशातच माझ्या वडिलांचा १९९६ मध्ये मृत्यू झाला व आमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. वडील गेल्यानंतर माझ्यावर मोठी जबाबदारी आली. पैसे कमाविण्याच्या नादात गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबत माझ्या भेटी-गाठी झाल्या व त्यांच्याशी संपर्क वाढत गेला. मी त्यांच्यासोबत जात नव्हतो; पण जे गुंड मित्र बनले होते, ते माझ्या खोलीमध्ये शस्त्रसाठा ठेवत होते व मला पैसे सुद्धा देत होते. मी एक दिवस एकांतात बसलो असता विचार आला की आपण या भानगडीत राहत नाही; परंतु हा शस्त्रसाठा आपल्या खोलीमध्ये सापडला तर पोलीस आपल्यालाच अटक करून कारागृहात टाकतील. मी एके दिवशी त्या गुंड मित्रांना म्हटले की, "तुम्ही माझ्या खोलीवर ही अवजारे ठेवू नका, मला भीती वाटते." तर त्यांनी मला धमकावलं व म्हटलं की, "साले जादा शहाणा बन रहा क्या? ज्यादा हुशारी मत मार, सामान तेरेच रुमपे रहेगा". मग मी विचार केला की, यांना न सांगता आपण खोली खाली करून दुसरीकडे चालले जावे व मी तसेच केले. त्यांना न सांगता ती खोली खाली करून बिडीपेठला दुसरी खोली घेतली व अशा गुंड लोकांपासून दूर झालो.
असे करता करता एका मागून एक दिवस जात होते. मी आपलं काबाडकष्ट करून उपजीविका चालवित होतो. एके दिवशी माझी आई मला म्हणाली की, "बेटा आपल्या हातांनी कुठपर्यंत स्वयंपाक करून खाशील, आमच्या मागे तर हा कर्मभोग लागला आहे व हा आमचा पिछा काही सोडत नाही, तू आता आपलं लग्न करून टाक." असे करता करता १९९९ ला माझ्या लग्नाचा योग जुळून आला व मला ‘परमात्मा एक‘ मार्गातील मुलगी मिळाली. तेव्हा मला मार्गाबद्दल काहीच माहीत नव्हते. माझे लग्न २५ एप्रिल १९९९ ला झाले. लग्नानंतर पहिली मंळागौर (काजळतिज) होती. मी पत्नीला म्हटले की, "मंगळागौरीची पूजा मांडशील व मी तिला पुजेकरिता लागणारे साहित्ये आणून दिले." पत्नी विचारत होती, पुजा कशी करावी लागते? कारण तिला अनेक देवांची पुजा करता येत नव्हती. तिचा जन्मच मार्गात झाल्यामुळे तिला याबद्दल समजत नव्हते. मग मी तिला म्हटले की, "माझ्या मित्राच्या पत्नीला मी पाठवतो, तिला विचारशील." तर तिने होकार दिला; परंतु भगवंताला काही वेगळेच घडवायचे होते. माझ्या मित्राची पत्नी पूजा कशी मांडायची हे सांगायला आलीच नाही. मी सायंकाळी घरी आलो व विचारले की, "पुजा का बरं मांडली नाही?" तर पत्नी म्हणाली की, "त्या ताई तर पूजा सांगायला आल्याच नाही व मला काही समजत नाही, आपण मार्गात चालले जाऊ, बाबांचा हा मार्ग खूप छान आहे, तुम्ही तर तुमच्या कुटुंबावरचे दुःख पहातच आले आहात. आपण या मार्गात प्रवेश केला तर आपल्यावर कोणत्याच प्रकारची बाहेरबाधा जोर करत नाही व तुम्ही तर निर्व्यसनी आहात, तुम्हाला तर काहीच अडचण येणार नाही." मला माझ्या पत्नीचे विचार पटले व मी हो नाही करता करता माझी मुलगी १ वर्षांची झाल्यानंतर, सन २००१ मध्ये मार्गात प्रवेश केला व योग्यरितीने कार्य करून पक्के सेवक झालो. मार्गात येऊन सुद्धा मी अनेकांसारखाच वागत होतो. जसे, पत्नी सोबत खोटे बोलणे, अनेकवाल्या मित्रांसोबत पार्टीला जाणे, त्यांच्यासोबत बिअर बार मध्ये बसणे. पण मी आधी पासून निर्व्यसनी होतो. पार्टीला गेल्यानंतर उशिरा घरी येत होतो. तेव्हा पती-पत्नीमध्ये वादविवाद होत होते. तेव्हा मी केरोसीन वाटपाचे सुद्धा काम करीत होतो. पैसा वैगेरे पुरेसा यायचा; परंतु घरात सुख शांती राहत नव्हती व नेहमी चिडचिड पणा राहत होता. कारण वाईट मार्गाने जर पैसा घरी येत असेल तर घरात शांतता राहत नाही. तसेच मी मार्गात असुन सुद्धा कधी चर्चा बैठकीत, हवन कार्यात जात नव्हतो. त्यामुळे मला मार्गाबद्दल जास्त माहिती नव्हती. अशा अशांतीच्या वातावरणातच २००७ मध्ये काही घरगुती कारणावरून आमचे पती पत्नीचे वाद झाले व आम्ही दोघांनीही एकमेकांशी अबोला धरला. जवळपास दिड महिना आमचा अबोला राहला व त्या काळातच माझ्यावर दुःखद प्रसंग ओढवला.
मी माझ्या ज्वेलरीच्या दुकानात असतांना, शोकेस मधील नेकलेस ग्राहकाला दाखवायच्या वेळेस शोकेशचा काच निघून तुटला, तुटलेला भाग माझ्या उजव्या हातावर आला व माझ्या उजव्या हाताच्या सात नसा कापल्या गेल्या. त्यात माझे ४ बोटांना फार इजा झाली होती. तेव्हा रक्तप्रवाह खूप झाला, हातातून रक्ताचे फवारे निघत होते. तसाच मी दुकानासमोरच्या दवाखान्यात गेलो व डॉक्टरांना सांगितले की, "माझ्या हातावर काच पडला." मी त्यांना हात दाखविला, त्याच क्षणी रक्ताचे फवारे निघणे सुरु झाले. ते डॉक्टर घाबरले व म्हणाले की, "दाबून ठेवा व तुम्ही लवकर मेडिकलला जा." त्यांच्या दवाखान्यातून बाहेर आलो तर माझी जेथे दुकान आहे, ते घरमालक मिळाले व त्यांनी विचारले की काय झाले? मी त्यांना झालेला प्रकार सांगितला, तर त्यांनी त्यांचे परिचित डॉ. देशमुख यांना फोन लाऊन झालेला प्रकार सांगितला. ते म्हणाले की, "मी नंदनवनला श्रावण हॉस्पिटलमध्ये आहे, तेथे तुम्ही या." आम्ही तेथे गेलो, त्यांना हात दाखविला, तर ते बघुन अरे बापरे म्हणाले व म्हणाले की, "ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागेल, नाही तर रक्त जाउन रक्तवाहिन्या जर सिकुडल्या, तर हात कापावा लागेल, जास्त उशीर झाला तर शस्त्रक्रिया करणे जमणार नाही." त्यांनी ताबडतोब शस्त्रक्रियेची तयारी केली व रात्री ८ वाजता शस्त्रक्रियेला सुरवात करून १२:३० ला संपली. माझ्या पत्नीला शेजाऱ्यांनी सांगितले तेव्हा तिला सर्व कळले. पत्नीने भगवंताचा धावा केला व म्हटले की, "बाबा, माझ्या पतीदेवाला वाचवा, आमच्याकडून चुक-भूल झाल्या असतील तर त्याची क्षमा द्या व आलेल्या संकटातून वाचवा."
भगवंत खूप दयाळू आहे. बाबांनी माझ्या पत्नीच्या शब्दांना मान दिला व मला लवकर बरं केलं. जर मी मार्गात नसतो तर तेव्हा माझा हात कापावा लागला असता. मी खूप भाग्यवान आहे की मला पत्नी म्हणून मार्गातील मुलगी मिळाली. तिच्यामुळे व बाबांच्या कृपेमुळे माझे जीवन सुखी झाले. नाहीतर माझ्या जीवनाचे वाटोळे झाले असते. मला माझी चूक लक्षात आली. त्यानंतर मी हिंगणघाट येथील सेवक सम्मेलनात गेलो. तेथे आदरणीय राऊत गुरुजींचे मार्गदर्शन एकले व त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यात परिवर्तन झाले. तसेच जयेश चंदनकर यांच्याशी भेट झाली व ते म्हणायचे की, "तुम्ही मार्गात आहात म्हणता, पण मला एकही हवनकार्यात दिसत नाही." मी त्यांना म्हटलं की, "मला माहिती मिळत नाही." तर जयेश चंदनकर म्हणाले की, "काही हरकत नाही, मी तुम्हाला हवणाचे मेसेज करत जाईल." तेव्हापासुन मी नेहमी मला जसा वेळ मिळेल, तसा हवन कार्यात जाण्याचा प्रयत्न करीत असतो. माझा लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
नाव:- श्री. विनायक रामचंद्रजी रोकडे.
पत्ता:- अयोध्या नगर, नागपूर
सेवक क्रमांक:- १२१७१
मार्गदर्शक- श्री. हरिभाऊजी बोकडे.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमान नगर,नागपूर.
••••••••••••••••••••••••••••••••••
अनुभव संकलन:- विनायक दादा रोकडे
--------------------------
-------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]
भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
========================
मानव धर्म एकता परिवार ( व्हाट्सअप्प ग्रुप व फेसबुक पेज) शी जुडुन भगवंत कार्याच्या ऑनलाईन चर्चा बैठकीचा लाभ घेण्यासाठी आणि आपले मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेले अनुभव सादर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार,
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment