महानत्यागी बाबा जुमदेवजीं यांचा पुत्र डॉ. मनो ठुब्रीकर | PARMATMA EK |

महानत्यागी बाबा जुमदेवजीं यांचा पुत्र डॉ. मनो ठुब्रीकर :-


महानत्यागी बाबा जुमदेवजीं यांचा पुत्र डॉ. मनो ठुब्रीकर | PARMATMA EK |
महानत्यागी बाबा जुमदेवजीं यांचा पुत्र डॉ. मनो ठुब्रीकर | PARMATMA EK |


    महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवास जागविण्याचे कार्य प्रथम आपल्या कुटुंबापासूनच केले. बाबांच्या शब्दांचा अनादर केल्यास त्याचे कार्य परिणाम होतात हे मागील प्रकरणात आपण पाहिले. आता त्यांच्या शब्दांचा आदर केल्यास त्याचे काय परिणाम होतात ते या प्रकरणात पाहू.

परमेश्वर प्राप्तीच्या अगोदर बाबा जुमदेवजी आणि आई सौ वाराणसीबाई यांच्या पोटी तीन अपत्ये जन्माला आलीत. परंतु त्यातील दोन अपत्ये भूतबाधा मुळे (अंधश्रध्दा) लहानपणीच परमेश्वरात विलीन झालीत आणि एकच अपत्य जीवंत राहिले. त्याचे नाव महादेव असे आहे. 

यालाच मनो या नावाने संबोधतात. महादेव हा लहानपणी सर्वसाधारण बुध्दीचा मुलगा होता. एकुलता एक मुलगा असल्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची असून सुध्दा बाबांची त्या मुलाला जास्तीत जास्त शिकविण्याची इच्छा होती. त्याचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नागपूर येथील महाल भागात असलेल्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये झाले. त्यावेळेस तो वर्गात सर्वसाधारण श्रेणीतील मुलगा गणला जात होता. मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण केल्यावर पुढील शिक्षणाकरिता त्याने सायन्स फॅकल्टीमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु वी.एस. सी. पार्ट वनमध्ये शिकत असताना तो वार्षिक परिक्षेत नापास झाला. त्यावेळेस बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली होती.

       आपल्या मुलाच्या बुद्धीबद्दल बाबांना माहित असल्यामुळे तो नापास झाला तरी ते त्याला काहीच बोलले नाहीत. उलट, पुढे प्रयत्न कर, परमेश्वर यश देईल, असे ते त्याला समजावत होते. कारण वाबांना पुर्ण विश्वास होता की, तो आज नाही तर उद्या निश्चितच प्रगती करील. महादेव नापास झाल्यामुळे खूप उदास झाला. एक दिवस त्याने बाबांना सांगितले की, मला आता यापुढे शिकायचे नाही. माझे डोके अभ्यासात चालत नाही. तेव्हा बाबांनी त्याला खूप समजावले की, नापास झालास म्हणून वाईट मानण्याचे काहीच कारण नाही. पुढे तुला जसे जमेल तसा अभ्यास कर. निश्चितच तुला यश येईल. परंतु तो काहीच ऐकायला तयार नव्हता. त्याने बाबांजवळ हट्टच धरला की, मी शिकत नाही. त्यावर बाबांना खूप वाईट वाटले. ते मनाशी म्हणाले की मी शिकवायला तयार आहे तर हा शिकत नाही. काय म्हणावे याला? आणि त्याच्यावर खूप रागावले. ते त्याला म्हणाले की, आमच्या पोटात सपूतच्या ऐवजी कपूत जन्माला आला आहे असे आम्ही समजू आणि तुला जे काही करायचे असेल ते तू कर. वरील कपूत शब्द महादेवच्या अंतःकरणाला खूप बोचला. त्याने बाबांची क्षमा मागितली आणि शब्द दिला की मी यापुढे निश्चित शिकेन. तसेच बाबा जसे म्हणतील तसे वागीन. 

नंतर त्याने पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा चंग बांधला आणि त्यानंतर ला कधीही मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षी विशेष योग्यता श्रेणीत तो पास हो लागला. यामागे बाबांचे वेळोवेळी होणारे मार्गदर्शन, परमेश्वराची कृपा आणि त्याने घेतलेले अथक परिश्रम यांचा सुरेख असा साधलेला त्रिवेणी संगत होता. त्यावेळेस त्यानेही एका परमेश्वराला मानण्यास सुरुवात केली होती. जब भगवान देता है तो छप्पर फाडके देता है या म्हणीनुसार त्याने बरीच मोठी प्रगती केली. 

त्याने १९६९ साली विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजीनियरींग नागपूर येथून बी.ई. मेटॅलर्जीची पदवी मेरीटमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना त्याला मेरीट स्कॉलरशीप(गुणवत्ता शिष्यवृत्ती) मिळत होती. त्यानंतर त्याला अमेरिकेत अत्यंत नावाजलेल्या न्यूयार्क युनिव्हर्सिटीची मेरीट शिष्यवृत्ती मिळाली आणि १९७१ साली त्याने या युनिव्हर्सिटीची मेटॅलर्जी आणि मटेरियल सायन्समध्ये एम्.एस. ही पदवी संपादन केली. त्यानंतर तो १९७५ साली येथूनच बायोमेडीकल इंजीनिअरींग या विषयात डॉक्टरेट(पीएच.डी.) ची परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. यावेळेस सुध्दा त्या देशाची मेरीट शिष्यवृत्ती त्याला मिळत होती.

            आज हाच महादेव डॉ. मनो ठुब्रीकर या नावाने अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया मेडीकल सेंटर, व्हर्जिनिया येथे असोसिएटेड प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ सर्जरी आणि डायरेक्टर ऑफ सर्जिकल म्हणून कार्यरत आहे त्याने तेथे हार्ट व्हाल्व, विशेषतः नॉर्मल, डिसीज्ड आणि बायोप्रोस्थेटिक ओरटीक व्हॉल्व यांवर रिसर्च केलेले आहे. त्याच्या अनेक संशोधनपर लेख यांना राष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. त्यांनी या विषयावर लिहिलेली बरीच पुस्तके बाहेर देशांतील अनेक युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता लागू करण्यात आलेली आहेत. त्यांना न्युयोर्क अॅकेडमी ऑफ मेडीसीनने मेरीट सर्टिफिकेट आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थ, यु.एस.ए. ने रिसर्च करिअर डेव्हलपमेंट अवार्ड देऊन गौरवान्वित केले आहे. आज ते जगातील नावाजलेल्या प्रथम नऊ शास्त्रज्ञांपैकी सातव्या क्रमांकाचे शास्त्रज्ञ आहेत. ते जगात ठिकठिकाणी वरील विषयावर मार्गदर्शन करतात. याचे श्रेय सर्वस्वी महानत्यागी बाबा जुमदेवजींना आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या शब्दांचा आदर करुन पालन केल्यामुळे आज डॉ. मनो हे अत्युत्तम अवस्थेत असून सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहेत. यामागे परमेश्वराची शक्ती आहे. बाबा आपल्या मार्गदर्शनात नेहमी सांगतात की, या मार्गात येणारा सेवक पुर्वी कितीही गरीब आणि अनाडी असला तरी सेवक झाल्यावर शिक्षणामुळे उच्च पातळीपर्यंत जाऊ शकतो. तो कधीही दुःखी आणि कष्टी राहू शकत नाही. म्हणून बाबांच्या शब्दांचा आदर करणे आणि त्यांचे तंतोतंत पालन करणे हे प्रत्येक सेवकाचे आद्य कर्तव्य आहे.








No comments

Powered by Blogger.