PARMATMA EK- ईच्छा अनुसार भोजन

PARMATMA EK- ईच्छा अनुसार भोजन



मोंगरकशा तलावावर घडलेल्या प्रसंगातुन सर्व सुखरुप मंगरली या गावी संध्याकाळी आल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवतकार्याची चर्चबैठक सुरु झाली. बैठकीत उपस्थित असलेल्या सेवकांनी या मार्गावर ते तत्व, शब्द आणि नियम शिकविले आहेत तसेच या मार्गाची उपासना केल्यावर त्यांना जे अनुभव आलेत त्यावर आपआपले विचार मांडले. त्यानंतर बाबांचे मार्गदर्शन झाले. सर्व लोक आनंदी वातावरणात असल्यामुळे बैठक बरीच उशिरापर्यंत चालली. त्या वेळेस रात्रीचे बारा वाजले होते.

बैठक समाप्त झाल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी त्या गावातील सेवकांना म्हणाले, आम्हाला आता नुसत्या दुधाचा चहा प्यावयास पाहिजे. या गावात आल्यापासून दोन दिवस झाले. पण दुधाचा चहा मिळाला नाही. तो आता पाहिजे अशी बाबांनी इच्छा प्रगट केली. सेवक हे ऐकून गोंधळला आणि बाबांना विनंती केली की, बाबा, एवढ्या मध्यरात्रीच्या वेळेस या गावात दुध कोठून मिळणार? घरीपण दुध नाही. कारण माझ्या घरच्या म्हशी जंगलात चरावयास गेल्या होत्या तेव्हा वासरुसुध्दा तिच्याबरोबर होते. त्या वासराने म्हशीचे संपूर्ण दुध पिऊन टाकले. म्हशी जेव्हा सायंकाळी जंगलातुन चरुन आल्यात तेव्हा मी दुध काढण्याकरिता गेलो असता म्हशीने एकही थेंब दूध दिले नाही. आता सांगा बाबा, मी दुधाचा चहा कसा पाजु? तेव्हा बाबा म्हणाले, मला माहित नाही की दुध कोठे मिळेल! तुम्ही दुध कोठुनही आणा आणि आम्हाला फक्त दुधाचा चहा पाजा. तो सेवक गवळी होता व साधारणतः ऐंशी वर्षाचा म्हातारा होता. तो बाबांना म्हणाला, बाबा या जंगलात जवळपास एकही गाव नाही आणि या गावात रात्री दूध मिळत नाही हा माझा आयुष्यभराचा अनुभव आहे. तेव्हा बाबा जुमदेवजी म्हणले, मला तुमचा अनुभव माहीत नाही. आणि त्याचे काही करावयाचेही नाही. आम्हाला दुधाचा चहा आताच पाहिजे. तेव्हा त्या सेवकाने बाबांना विनंती केली की, बाबा आपण मला मार्गदर्शन करा की मला दुध कोठून मिळेल?

महानत्यागी बाबा जुमदेवजी सर्वांना उद्देशुन म्हणाले, एका परमेश्वराची कृपा प्राप्त केलेली आहे. भगवंत दूध देईल. त्यानंतर त्या सेवकाला बाबा म्हणाले, ज्या म्हशीने एकही थेंब दूध दिले नाही त्याच म्हशीला समोर आणा आणि घरात जाऊन बाबा हनुमानजीच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती लावून कापूर लावा आणि विनंती करा की, बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवर्जीना दुधाचा चहा पाहिजे, तर बाबांकरिता दुध द्या. बाबांनी असे सांगितल्यावर त्या सेवकाने बाबांच्या आदेशाचे पालन केले आणि वर सांगितल्याप्रमाणे विनंती केली. त्यानंतर तो बाहेर आला.



भगवंताचे नामस्मरण करुन त्याने त्या म्हशीच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि भांडे घेऊन तो म्हशीचे दूध काढू लागला. आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या म्हशीने दूध दिले नव्हते त्याच म्हशीचे दूध तो चर-चर करीत काढू लागला. त्या म्हशीने साधारणतः दोन लिटर दूध दिले. या मार्गातील सेवक नवरगावचे सरपंच श्री. वाघमारे हे त्या गवळ्याजवळ पाहावयास गेले असता त्याला दुधाने पूर्ण भरलेले भांडे दिसले. त्याने तो गंज आणून बाबांजवळ ठेवला तेव्हा सर्वजण ही भगवंताची लीला बघून अवाक झाले. त्यानंतर बाबा सेवकाला म्हणाले, या संपूर्ण दुधाचा चहा बनवा. त्यात मुळीच पाणी टाकु नका आणि थेंबभर दुध शिल्लक ठेवू नका. त्याप्रमाणे त्या संपूर्ण दुधाचा चहा बनवुन तो सर्वांना दिला.

 तो म्हातारा गवळी सेवक बाबांना म्हणाला की बाबा याच म्हशीप्रमाणे दुसरी म्हैस  सुध्दा दुध देईल काय? त्यावर बाबांनी उत्तर दिले तुम्ही तुमचा अनुभव घेऊन पाहा. तुम्ही एकाच भगवंताचे मनापासून सेवक आहात आणि दिलेल्या तत्व, शब्द, नियमाने वागत असाल तर परमेश्वर नक्कीच यश देईल. परमेश्वर देतो पण मानवाचा परमेश्वरावर विश्वास नाही.


म्हणून बाबांनी तत्वात सांगितले आहे की,"इच्छा अनुसार भोजन" म्हणजेच मानवाने कोणतीही इच्छा परमेश्वराजवळ प्रगट केली तर तो ती पूर्ण करतो. पण त्याकरिता एक लक्ष, एक चित्त, एक भगवान मानून सत्यकर्म करावयास हवे.

No comments

Powered by Blogger.