परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल नागपुर
परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल नागपुर
![]() |
| परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल नागपुर |
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यापासून त्याच्याविषयी मानवांना सतत जागविण्याचे कार्य करीत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या मानवधर्माचे जे तत्व, शब्द आणि नियम दिले आहेत त्याचे पूर्णपणे पालन केल्यावर अनेक सेवकांचे दुःख नाहीसे झाले आहे व दररोज होतही आहे. जसजसा या कृपेचा लाभ सेवकांना होत आहे तसतशी या मार्गातील सेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
हा धर्म नवीन असल्यामुळे यातील तत्व, शब्द, नियम यामुळे जुन्या आचारधर्माला तिलांजली देऊन नवीन संस्कृती तयार करण्याची प्रक्रिया घडत आहे. पिढ्यान्पिढ्या चालू असलेल्या आचारधर्माला सोडणे हे बहुतेक लोकांना पटत नाही आणि जे लोक या मार्गाचे सेवक बनतात त्यांना या जुन्या चालीरीती नष्ट कराव्या लागतात. यामुळे या मार्गात आलेले सेवक बाबांच्या मार्गदर्शनाने जरी शारीरिक आणि मानसिक दुःखापासून मुक्त झाले तरी त्यांना सामाजिक त्रास होऊ नये असे बाबांना वाटले.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्याकडे भगवत्कार्याची बैठक सुरु असताना ते निराकारामध्ये आले आणि आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, या मार्गातील सेवक बुध्दीहीन आणि श्रमिक आहेत. त्यांच्या परिश्रमाचे लाभ त्यांच्या जर वनात त्यांना मिळत नाहीत. नवीन संस्कृतीत ते वावरत असल्यामुळे जुन्या आचारविचारांच्या लोकांना हे पटत नाही आणि त्यांना समाजापासून त्रास होतो. याकरिता त्यांची एकता आणि संघटना असणे आवश्यक आहे म्हणून बाबांनी त्यांना सेवकांत व कुटुंबात एकता कायम करणे हा नियम पाळावयास दिला.
संघटना सुदृढ व्हावी या उद्देशाने बाबांनी फंड अनुदान सुरु करुन दर महिन्याला एकदा सेवकांकडे आणि प्रत्येक शनिवारी बाबांकडे भगवत्कार्याची चर्चाबैठक सुरु केली. अशाप्रकारे सतत १९६६ ते १९६९ पर्यंत कार्य सुरु असून सेवकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत असल्यामुळे सेवकांच्या भल्याकरिता बाबांनी आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक कार्याकडेही लक्ष घातले आणि सेवकांना रोजच्या रोज लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याकरिता काही गोष्टी निर्माण करण्याचे ठरविले.
त्याकरिता सेवकांची संघटना होती तरी ४ डिसेंबर १९६९ रोजी "परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर' या नावाची संस्था रीतसर तयार करण्यात आली. या मंडळाची कार्यकारिणी श्रीमान महादेवराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने मंडळाचे कार्य सुरु झाले. या मंडळाचे कार्यालय श्री. रामाजी उपासराव मौदेकर यांच्या निवासस्थानी टिमकी येथे सुरु करण्यात आले. या मंडळामार्फत प्रत्येक वर्षी एक भगवान प्रगट दिन साजरा करणे, सेवकांच्या बैठकी घेऊन भगवत्कार्याची चर्चा घडविणे, याबरोबरच सेवकांकरिता सामाजिक कार्य करणे इत्यादी कार्ये केली जातात.
सर्वात प्रथम फंड अनुदान गोळा करुन १९७६ साली सहकारी बँक निर्माण करण्यात आली. त्यानंतर रोजच्या उपयोगात लागणाऱ्या वस्तु योग्य आणि माफक भावात सेवकांना मिळाव्यात म्हणून जागनाथ बुधवारी, नागपूर येथे ग्राहक भांडार ची स्थापना केली. या संस्थेव्दारा ते लोकांची सेवा करीत आहेत. त्याचबरोबर या मंडळाने खेड्यातील सेवकांना त्यांच्या शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून रामटेक जिल्ह्यातील सालईमेटा आणि भंडारा जिल्ह्यातील धोप या गावी दुध उत्पादक संस्था स्थापन करुन तेथील लोकांना रोजगार मिळवून दिला. हे सर्व कार्य करीत असताना या मंडळाची धर्मादाय खात्याकडे धर्मादाय संस्था म्हणून १९७९ साली नोंदणी करण्यात आली. संस्थेची रीतसर नोंदणी झाली असून धर्मादाय आयुक्त, नागपूर यांचे नोंदणीपत्राचा क्रमांक महाराष्ट्र/२२३/७९ नागपूर १४ ऑगस्ट १९७९ असून प.ट्रस्ट क्र. एफ २५०२ नागपूर असा आहे.
वरील संपूर्ण कार्य घडविल्यानंतर या संस्थला स्वतःची वास्तु असावी म्हणून बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सेवकांनी प्रयत्न करुन मानव मंदिर नावाची स्वतःची भव्य ते वास्तु निर्माण केलेली आहे. या संस्थांचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी असून आद्य मठाधिपती आहेत.
या वास्तुत नागपूर बाहेर सेवकांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांकरिता राहण्याची व्यवस्था केली आहे. या मंडळातर्फे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांकरिता योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून वाचनालयही सुरु करण्यात आलेले आहे. त्याचा लाभ अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढत आहे. या वाचनालयात धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, रोजगार समाचार इत्यादी आवश्यक बाबीवरील पुस्तके व दैनिक, मासिके ठेवण्यात आलेली असून सेवक याचा लाभ घेत आहेत.
या मंडळातर्फे क्रीडामंडळही स्थापन करण्यात आले असून क्रीडांगणही तयार केले आहे. अनेक सेवक त्याचा उपयोग घेत आहेत.

Leave a Comment