PARMATMA EK- मर्यादित कुटुंब
PARMATMA EK- मर्यादित कुटुंब
![]() |
PARMATMA EK- मर्यादित कुटुंब |
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माच्या शिकवणुकीत जे चार तत्व, तीन शब्द आणि पाच नियम दिलेले आहेत, त्यातील नियम पाचमध्ये त्यावेळच्या परिस्थितीनुसार मानव मंदिर सजविण्याकरिता फंड अनुदान जमा करणे हा नियम दिला होता. त्याप्रमाणे बाबांनी सेवकांचे मानव मंदिर, सहकारी बैंक, ग्राहक भांडार यांच्या स्वरुपात सजविल्यानंतरही सेवकांना जीवनचरितार्थ चालवितांना त्रास होतो हे लक्षात आल्यानंतर त्याच्या कारणाचे संशोधन करुन त्यावर निदान काढले.
सध्याची देशाची किंवा संपूर्ण जगाची परिस्थिती पाहून जाता मानवांना भेडसावणाऱ्या समस्या कोणतेही सरकार पूर्णपणे सोडवू शकत नाही किंवा कोणतेही सरकार आपल्या देशाची भरभराट करु शकत नाही. वाढमी महागाई, अन्नधान्याची टंचाई, उद्योगधंदे कमी पडणे याला जर कोणी जबाबदार असेल तर ती वाढती लोकसंख्या आहे. जोपर्यंत या वाढत्या लोकसंख्येला आळा बसणार नाही. तोपर्यंत हल्लीच्या काळात कोणताही देश आपली प्रगती करु शकत नाही. म्हणून प्रत्येक देशाच्या सरकारने याविषयी बरेच संशोधन करुन कुटुंब कल्याण या नावाची योजना राबविणे सुरु केले आहे. त्यात भारत हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु ही योजना भारतात सरकारतर्फे यशस्वी झाली नाही. भारत सरकार अजूनही मर्यादित कुटुंबाकरिता मानव जागृती करुन निरनिराळ्या प्रकारच्या योजना राबवीत आहे पण सरकार अजुनही लोकसंख्येला मात्र आळा घालु शकले नाही.
![]() |
PARMATMA EK- मर्यादित कुटुंब |
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी भगवान बाबा हनुमान जी चा वार्षिक कार्यक्रम आणि एका भगवंताचा सदतिसावा प्रगट दिनोत्सव दि. १७/८/१९८४ रोजी साजरा करीत असतांना सेवकांना भेडसावित असलेल्या समस्यांचे निवारण खालीलप्रकारे मार्गदर्शन केले.
ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, जीवनात चालण्याकरिता, गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी जे नियम दिले आहेत त्यातील पाचवा नियम मंदिर सजविण्याकरिता फंड अनुदान गोळा करणे याऐवजी "आपले कुटुंब मर्यादित ठेवणे" हा नियम आजपासून अमलात आणावा. कारण फंड अनुदान भरपूर झाले असून त्या फंडाचा सदुपयोग आपण चांगल्या कामाकरिता केला आहे आणि त्या सर्व गोष्टींचा लाभ सेवकांना मिळतही आहे. परंतु सेवकांना त्यांच्या मुलांचे योग्यरित्या पालनपोषण करता यावे आणि त्यांना चांगले शिक्षण देता यावे याकरिता प्रत्येक कुटुंबात परिवार-नियोजन आणण्यासाठी खालीलप्रमाणे नियम पाळावेत असा आदेश सेवकांना दिला.
१) या मार्गात जे सेवक आहेत किंवा होतील, त्यांच्या कुटुंबातील ज्यांचे लग्न झाले आहे किंवा पुढे होईल त्यांनी लग्नानंतर १६ वर्षाया अवधीमध्ये फक्त दोन किंवा तीन मुले होऊ द्यावीत.
२) डॉक्टरी सल्ला घेऊन बायांनी गर्भप्रति धक उपाय करावेत.
३) प्रत्येक कुटुंबात मुलाच्या लग्नाची वयोमर्यादा २५ वर्षांची असावी. २५ वर्षांच्या आत कोणत्याही मुलाचे लग्न करु नये.
महानत्यागी बाबा जुमदेवजी पुढे म्हणाले की, आज असे पाहण्यात येत आहे की, लग्न झाल्यावर ४-५ वर्षातच ३-४ मुले जन्माला येतात. त्यामुळे आईवडिलांची त्यांचे पालनपोषण करतांना तारांबळ उडते आणि त्यांना खूप त्रास होतो. त्याप्रमाणे आईच्या प्रकृतीवरही परिणाम होतो. वरील नियमांचे पालन केल्यास त्रास कमी होईल आणि खर्चात बचत होऊन जीवनमान उंचावेल म्हणून सर्वांनी यापुढे "मर्यादित कुटुंब" हा नियम पाळावा असा आदेश दिला आणि त्या दिवसापासून म्हणजे १७ ऑगस्ट १९८४ पासून सर्व सेवकांनी तो नियम अमलात आणला.
अशाप्रकारे जे काम सरकार एकाएकी करु शकत नाही ते कार्य या मार्गातील सेवक बाबांच्या आदेशानुसार मार्गदर्शन करुन त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळवितात.


Leave a Comment