PARMATMA EK- परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक
PARMATMA EK- परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक
![]() |
| PARMATMA EK- परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक |
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आदेश दिल्याप्रमाणे फंड अनुदान गोळा करण्यात आले. हे कार्य सतत नऊ वर्षे सुरु होते. याच वेळेस सेवकांची संख्या पण सारखी वाढत होती.'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे १९६६ ते १९७५ या नऊ वर्षांत एकोणचाळीस हजार रुपये फंड अनुदानात जमा झाले होते. ती संपूर्ण रकम बँकेत जमा होत होती. या रकमेवर एकोणवीस हजार रुपये व्याज मिळाले होते. अशाप्रकारे अठ्ठावन हजार रुपये जमले होते.
जानेवारी १९७५ साली बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागूपरच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यांत या जमलेल्या पैशाचा कसा उपयोग करावा, या विषयावर चर्चा झाली. तेव्हा बहुतेक कार्यकर्त्यांकडून असा विचार व्यक्त करण्यात आला की, या पैशाची क्रेडिट सोसायटी निर्माण करावी जेणेकरुन गरीब सेवकांना याचा लाभ मिळेल. बाबांनी सर्वाचे विचार शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर बाबांनी मार्गदर्शनात सांगितले की "हमें खजिना तयार करना है।" तेव्हा सेवकांनी बाबांना विनंतीवजा सांगितले की, बाबा सहकारी बँक स्थापन करावी काय? तेव्हा बाबांनी होय म्हटले आणि बँक स्थापना करण्याकरिता लागणारे भांडवल ५० हजार रुपये लागते हेही सांगितले. हे समजल्यावर पन्नास हजाराच्यावर भांडवल जमा असल्यामुळे त्यातील काही कार्यकर्त्यांना बाबांनी आदेश दिला की, उपविधीचे पुस्तक घेऊन बँकेचे प्रपोजल १५ दिवसांत तयार केले.
जमलेले पैशाचे शेअर्समध्ये रुपांतर केले. या प्रपोजलची प्रवर्तक कमेटी नेमून श्री. महादेवरावजी कुंभारे यांना प्रमुख नेमण्यात आले. ते प्रपोजल लगचे सहकारी कायद्याप्रमाणे नागरिक सहकारी बँक नोंदणी करण्याकरिता सहकार खात्याकडे आवश्यक त्या संपूर्ण माहितीसह सादर करण्यात आले. त्या सालापर्यंत अर्बन बँकेची पन्नास हजार रुपये भागभंडवलावर नोंदणी होत होती.
पंधरा दिवसांनी ते प्रपोजल खात्याकडून परत आले त्याची संपूर्ण चौकशी केली असता असे कळले की बँक नोंदणीसाठी ५० हजार ऐवजी एक लाख भागभांडवल पाहिजे. म्हणून एक लाख भागभांडवल झाल्यावर प्रपोजल पाठविण्यात यावे असे त्यावर लिहिले होते. कारण याच सुमारास सहकार खात्यातील नियमात बदल झाला होता. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला की, नऊ वर्षात ३९ हजार रुपये जमले तर एक लाख रुपये जमवायला किती वेळ लागेल? म्हणून पुन्हा कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली आणि तेथे विचारविनिमय सुरु झाला.
बाबांनी कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि सांगितले की, जर कार्यकर्ते बाबांना साथ देत असतील, तर नागपूरला प्रत्येक गटात सेवकांची बैठक घेऊन मार्गदर्शन करु व त्याप्रमाणे बाबा बरोबर जे कार्यकर्ते फिरावयास तयार असतील त्यांनी नावे द्यावीत. त्याचबरोबर जर नागपूरला तेवढे भागभांडवल जमले नाही तर बाहेर गावांतील सेवकांकडून जमा करण्यात यावे असेही ठरले. या वेळेस या मार्गाचे सातशे (७००) सेवक होते. ठरल्याप्रमाणे महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि ९० ते १०० सेवक मंडळी दररोज सकाळी आठ वाजता निघून रात्री बारा वाजेपर्यंत नागपूर येथील सेवकांकडे घरोघरी जाऊन त्यांना अडचणी सांगून त्यांच्याकडून पैसे गोळा करु लागले. यावेळेस या मार्गात बहुतेक गरीब सेवक होते. त्यांनी बाबांच्या आदेशाचे पालन करुन जास्तीत जास्त मदत केली.
नागपूरच्या सेवकांकडून गोळा झालेली रकम सहकार खात्याची मर्यादा पुर्ण करु शकली नाही. म्हणून बाबा आणि सेवक बाहेर गावी असलेल्या सेवकांच्या घरी गेले आणि साधारणतः दोन महिन्यांत ५० हजार भागभांडवल जमा केले. हे भागभांडवल जमा करीत असताना बाबांनी जेवणाची पर्वा केली नाही. ते उन्हातान्हात सारखे फिरत होते. कोणाकडेही चहा घेत नव्हते. धन्य महानत्यागी बाबा जुमदेवजी भागभांडवल एक लाखाची मर्यादा पूर्ण झाल्यावर प्रपोजल पुन्हा नोंदणीकरिता सहकार खात्याकडे सुपुर्द केले. त्या खात्याने ते प्रपोजल मुंबईला पाठविले. परंतु त्याचे उत्तर सहा महिने झाले तरी आले नाही. नागपूर येथे चौकशी केली असता सारखे टोलवाटोलवीचे उत्तर मिळत होते. म्हणून बाबांच्या मनात शंकाकुशंका निर्माण झाल्या. त्यावेळेस बाबांचे मेहणे श्री. सोमाजी बरडे हे मुंबईला कामानिमित्त सारखे जात असत. म्हणून बाबांनी त्यांना या प्रपोजलबद्दलची चौकशी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी मुंबईला जाऊन चौकशी केली असता असे कळले की, प्रपोजल केव्हाच मंजूर करुन नागपूरला पाठविले आहे. त्याप्रमाणे त्यांनी पत्र क्रमांक व तारीख लिहून घेतली आणि नागपूरला आल्यावर त्यांनी ती माहिती बाबांकडे दिली.
बाबा स्वतः या प्रपोजलचे प्रमुख प्रवर्तक श्री. महादेवरावजी कुंभारे यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी ती माहिती देऊन नागपूरच्या सहकार खात्याकडे चौकशीकरिता पाठविले. बाबांचा आदेश घेऊन श्री. महादेवराव कुंभार सहकार खाते, नागपूर यांच्याकडे त्याच दिवशी लगेच चौकशी करण्याकरिता गेले परंतु या भ्रष्टाचारा काळात लालफीतशाही कोणाला ऐकेल तो सुदिन समजावा. सर्व कायदे त्यांच्या हातात असतात ना! मग जनतेने त्यांना सलाम केलेच पाहिजे. चौकशीअंती कुंभारे यांना सांगण्यात आले की, अजुन प्रपोजल आले नाही. आल्यावर कळविण्यात येईल. त्यानंतर श्री. कुंभारे यांनी खूप विनवणी केली की, आपण तपासून पाहा. बहुतेक आलेले आहे असे वाटते. जर कोणी ऐकून घेतले तर ती लालफीतशाही कशी? उलट ते कुंभारेवर रागावले. ऑफीसमध्ये काम आम्ही करतो की तुम्ही? फाईल न बघताच त्यांनी सांगितले की, तुमच्या प्रपोजलची मंजुरी आलेली नाही. एक महिना वेळ लागेल. तुम्ही जा. आम्ही तुम्हाला कळवू. हे ऐकल्यावर कुंभारे यांना खूप वाईट वाटले. कुंभारे यांच्याजवळ प्रपोजल मान्य झाल्याची माहिती असूनही त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितल्यावर ते ऐकायला तयार नव्हते. यावरुन लालफीतशाही किती कठोर असते हे सिध्द होते.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी कुंभारे यांना सांगितल्याप्रमाणे त्यांची तक्रार जॉईन्ट रजिस्ट्रार यांच्याकडे केली आणि सर्व सत्य परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. सहकार खात्याला फोन करुन त्यांनी संपूर्ण प्रपोजल आपल्याकडे मागविले. त्यांच्याकडे संपूर्ण रेकॉर्डसह फाईल गेली. त्यांची स्वतःती केस पाहिली आणि लगेच चार दिवसांनी प्रवर्तकांना त्यांचे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडून त्यांचे पत्र क्रमांक एन.जी.पी./बी. एम.के./२३८/७५ नुसार दि. १९/९/७५ रोजी संस्था रजिस्टर झाल्याचे कळविण्यात आले. लालफीतशाही ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चालत नाही. परंतु प्रत्येक वेळेस वरिष्ठ अधिकारी पुर्णपणे लक्ष घालू शकत नाहीत. म्हणून जनेतेने नेहमी दक्ष असावयास पाहिजे हे यावरुन सिध्द होते. वरील पत्राप्रमाणे परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक मर्यादित, नागपूर" कार्यक्षेत्र संपूर्ण नागपूर जिल्हा निर्धारित करुन नोंदणी केली.
बँकेची रीतसर नोंदणी झाल्यानंतर बँकींग व्यवसाय सुरु करण्याकरिता रिझर्व्ह बँकेकडे परवानगीकरिता अर्ज सादर करण्यात आला. परंतु याही वेळेस अडथळा आला. याच सुमारास रिझर्व्ह बँकेचे नियम बदलले होते. म्हणून नवीन बदललेल्या नियमानुसार तीन लाख रुपये भागभांडवल गोळा झाल्याशिवाय बँकींग व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देता येत नाही असे कळविण्यात आले. हे कळल्यावर बाबांच्या समोर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला की, एक लाख रुपये जमवायला खुप कष्ट करावे लागले तर तीन लाख रुपये जमवायला किती काळ लागेल आणि कसे जमा होतील? कारण या मार्गातील सेवक गरीब आणि परिस्थितीने मागासलेले होते. दुसरी गोष्ट पैसे फक्त सेवकांकडूनच घ्यावे हा बाबांचा निर्धार होता. त्यावेळेस फक्त ७०० सेवक होते. पुन्हा बाबांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यांना संपूर्ण परिस्थितीबद्दल मार्गदर्शन केले आणि नागपूर येथे प्रत्येक गटामध्ये बैठक घेण्याचे ठरले.
पहिली बैठक बिनाकी मंगळवारी, नागपूर येथे झाली. या बैठकीत प्रवर्तक कमेटीशिवाय बाबांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत त्या गटातील सेवकांशिवाय इतर गटांतील सेवकही उपस्थित होते. प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीच्या आयोजनाबद्दल सांगून बँकेच्या निर्मितीकरिता येणाऱ्या अडचणींबाबत विचार सेवकांसमोर ठेवले. तेव्हा काही सेवकांनी आपले विचार मांडले की, बाबा आम्ही गरीब परिस्थितीने मागासलेले सेवक दोन लाख रुपये कसे जमा करणार? हे तर शक्य होणार नाही. तरी सुध्दा बाबांनी आम्हास योग्य मार्गदर्शन करावे अशी सेवकांनी विनंती केली. सेवकांच्या इच्छेनुसार बाबांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, बाबा ज्याकरिता वैथे उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल प्रमुख कार्यकर्त्यांनी माहिती सांगितली असता आपण जे विचार ठेवले ते योग्य आणि सत्य आहेत यात वाद नाही. परंतु आजची गरज भागविण्याकरिता थोडे कष्ट करावे लागतील.
थोडे सोसावे लागले तरी भगवंत तुमची गरज पुर्ण करील, पण सेवकांनी नाकारु नये. याप्रमाणे बाबांचे मौलीक मार्गदर्शन झाल्यावर बैठक समाप्त झाली. दुसरी बैठक बुधवारी येथे श्री. हरिभाऊ भनारकर यांच्याकडे झाली. येथेही बैंक निर्मितीकरिता येणारी अडचण सांगण्यात आली. त्यावर सेवकांनी आपआपले विचार सांगितले आणि गरीब परिस्थितीत पैसे कोठून आणणार हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळेस असे वाटत होते की, बँक निर्माण करण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न आणि श्रम सेवकांच्या समस्या असल्यामुळे वाया जातात की काय असे कार्यकर्त्यांना वाटू लागले. परंतु भगवंताची कृपा महान आहे. सेवकांनी बाबांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. बाबांनी सर्वांचे विचार ऐकले होतेच. बाबा निराकारमध्ये आले आणि सर्व सेवकांना उद्देशुन रागाने म्हणाले, "बैठक बंद करो। बाबा किसीका नही सुनेंगे। जब तक दो लाख रुपया जमा नही होता तब तक बाबा किसी सेवक के घर में पानी तक नहीं पियेंगे। यह बाबा का प्रण है।" हे ऐकल्यावर सर्व सेवक चकित झाले दुःखी झाले.
त्यानंतर बाबा पुन्हा सेवकांकडे पैसे गोळा करण्याकरिता काही सेवकांसोबत गावोगावी, खेडोपाडी, उन्हातान्हात, पायी, बैलगाडीने फिरले. परंतु ते कोणाकडेही पाणीसुध्दा पीत नव्हते. अशाप्रकारे बाबांनी त्यागाने आणि सेवकांनी केलेल्या परिश्रमांमुळे दोन लाख रुपये अवघ्या दोन महिन्यात जमा केले आणि हा संपूर्ण पैसा गरीब सेवकांकडूनच वसुल करण्यात आला. सेवकांशिवाय इतर लोकांकडून पैसा वसूल करण्यात आला नाही. या सेवक सेविकांनी खूप मेहनत करुन मोलमजुरी करुनच काही सेविकांनी तर स्वतःचे दागिने मोडून बाबांच्या आदेशाचे पालन केले आणि त्यांनी केलेल्या त्यागाचे फलित म्हणून हे कार्य भगवंताने अल्प काळात पूर्ण केले. "भगवान के पास देर है, अंधेर नहीं' या म्हणीप्रमाणे या गरीब लोकांनी जे कष्ट सोसले त्याची पुर्णपणे भरपाई भगवंताने त्यांना लवकरच करुन दिली.
तीन लाख रुपये भागभांडवल पूर्ण झाल्यावर रिझर्व्ह बँकेला कळविण्यात आले आणि दि. ३० ऑगस्ट १९७६ रोजी रिझर्व्ह बँकेकडून रितसर बँकींग व्यवसाय सुरु करण्याचा परवाना मिळाला. दिनांक ४ डिसेंबर १९७६ रोजी गोळीबार चौक येथे बैंकेचे कार्यालय सुरु करण्यात आले. त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री श्री. रामकृष्णजी बेत यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री. व्ही. एम. जोगळेकर, रिटायर्ड मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म. मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या हस्ते बँकेचा उद्घाटन समारंभ पार. पडला.
अशारीतीने दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या मानवांची एक बँक निर्माण झाली असून एकेका थेंबाने बँकरुपी तळे बाबांनी भरुन दिले आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. ही बँक निर्माण करतांना गोळीबार चौकसारख्या मागासलेल्या भागात ही बँक कशी निर्माण होईल. याबद्दल तेथील इतर लोकांच्या मनात शंकाकुशंकाचे बी पेरल्या गेले होते. कारण व्यवसाय श्रीमंत लोकांच्या हाती होते आणि जगात सहकारी तत्वांवर ज्या बँका निर्माण झाल्या आहेत त्यात सर्व श्रीमंत लोक भरलेले आहेत. अशा परिस्थितीत यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. परंतु बाबा जुमदेवींचे मार्गदर्शन, केलेला त्याग, कार्यकर्त्यांची चिकाटी, सेवकांनी दिलेली साथ आणि परमेश्वरी कृपा यामुळे हे महान कार्य घडले यात शंका नाही. यानंतर या बँकेला स्वतःची वास्तु असावी, शहरातील मागासवर्गीय विभागातील लोकांचा विश्वास बसावा आणि लोकांचे बँकींग व्यवसायात सहकार्य मिळावे या दृष्टीने येथील कार्यकर्त्यांनी विशेषतः बँकेच्या कार्यकारी मंडळाने निष्काम भावनेने सेवा केली.
बँकेच्या भागधारकांनी बँकेला होत असलेल्या नफ्यातुन आवश्यक ती तरतूद केल्यावर उरलेला नफा इमारतनिधीमध्ये वळता करण्याचे ठरविले व जोपर्यंत बँकेची वास्तु तयार होत नाही तोपर्यंत लाभांश घ्यावयाचा नाही असा संकल्प भागधारकांनी केला. या संकल्पामुळेच अल्पावधीतच या बँकेची स्वतःची वास्तु तयार झाली आणि २५ मार्च १९८४ रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या हस्ते तिचे उद्घाटन झाले. ज्यावेळेस ही वास्तु निर्माण झाली त्यावेळेस सहकारी क्षेत्रात चालू असलेल्या नागपूरातील आठ बँकांमध्ये स्वतःची वास्तु असणारी ही एकमेव बँक ठरली.
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी दिलेल्या प्रेरणेनुसार बँकेतील पदाधिकारी तथा कर्मचारी निष्काम सेवेस बांधलेले आहेत. बँकेचा कोणताही पदाधिकारी सेवेबद्दल कसल्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत. बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत सुध्दा स्वतःच्या चहापानाचा खर्च स्वतः करतात. इतकेच नव्हे तर ज्या बाबांनी एवढी मोठी बँक घडविली, मार्गदर्शन केले, स्वतः कष्ट केले, स्वतःच्या शरीराची झीज केली, ते महानत्यागी बाबा जुमदेवजी हे संस्थापक असून सुध्दा तेथील पैशांवर जगणे किंवा स्वतःकरिता काही पैसे खर्च करणे हे तर सोडाच पण बँकेत गेले तर बँकेच्या पैशाने चहा सुध्दा घेत नाहीत. धन्य ते त्यागी बाबा जे आम्हा सेवकांना लाभलेत आणि या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात वाखाणण्यासारखी, निष्काम भावनेने कार्य करणारी, दारिद्र्य रेषेखालील गरीब लोकांच्या उत्पन्नातुन निर्माण झालेली, आगळीवेगळी बँक म्हणजे परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बैंक मर्यादित, नागपूर ही होय.
या बँकेच्या भरवशावरच महानत्यागी बाबा जुमदेवजींनी रामटेक तालुक्यातील सालईमेटा आणि भंडारा जिल्ह्यातील धोप या गावी दुध उत्पादक संस्था आणि बुधवारी नागपूर येथे ग्राहक भांडाराची स्थापना केली आहे आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणले आहे.

Leave a Comment