PARMATMA EK- फंड अनुदान

   PARMATMA EK- फंड अनुदान

PARMATMA EK- फंड अनुदान
PARMATMA EK- फंड अनुदान


          महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनाने या मार्गातील सेवकांना परमेश्वरी कृपेचा लाभ मिळाला. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक समाधान मिळाले. तसेच, भगवत्कृपा त्यांच्या पाठीशी उभी राहिली. बाबांकडे येणारे बरेच सेवक विशेषतः जास्त प्रमाणात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांतील गरीब, कष्टकरी, हातमजुरी करणारे, शेतमजुर, विणकर इत्यादी बहुजन समाजाचे लोक आहेत. ते सेवक दुःखामुळे होरपळून निघालेले असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती एकदम खालावलेली होती. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी निराकार बैठक होत होती.


            १९६६ सालची गोष्ट. अशाच एका शनिवारी निराकार बैठक सुरु असताना सेवकांची आर्थिक परिस्थिती सुदृढ व्हावी आणि आर्थिक स्थैर्य मिळावे म्हणून त्याबद्दल सेवकांनी बाबांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. एकदा बाबा निराकार स्थितीमध्ये विदेह अवस्थेत असताना त्यांच्या मुखकमलातुन शब्द बाहेर पडले की, या मार्गात आलेले सेवक बुध्दीहीन, श्रमिक, गरीब आणि कष्टकरी आहेत. या कलियुगात असत्य व्यवहारामध्ये त्यांना त्यांच्या परिश्रमाचा लाभ त्यांच्या जीवनात मिळत नाही. 



         बाबा पुढे म्हणाले, या मार्गात आलेल्या सेवकांवर नियमरुपाने सर्वप्रकारची अनेक बंधने घातलीत आणि अनेक वाईट मार्गानी जाणारा पैसा वाचविला. त्यामुळे त्यांच्या जीवनात प्रगती झाली. त्यांच्या वाईट भावना संपल्यात. म्हणून त्यांच्या आर्थिक परिस्थितीची उत्तरोत्तर प्रगती व्हावयास पाहिजे. म्हणून त्यांनी सत्य निर्माण करण्याकरिता आणि मानवी जीवन वर आणण्याकरिता फंड अनुदान देण्याचा सेवकांना आदेश दिला.



          त्यानंतर पुढील बैठक याच मार्गाचे जेष्ठ सेवक श्री. बाजीरावजी माटे यांच्या निवासस्थानी झाली. त्या बैठकीत सेवक आणि जबाबदार कार्यकर्ते हजर होते. त्या बैठकीत बाबांच्या आदेशाप्रमाणे एका सेवकाने सर्व सेवकांना सांगितले की, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा असा उद्देश आहे की, या मार्गात रंजले गांजले या म्हणीप्रमाणे गोरगरीब सेवक आहेत. ते अशिक्षित आहेत. म्हणून परिश्रम करुन मिळविलेला पैसा अनेक मार्गानी वाहून जातो. त्यामुळे त्याला पैशाची जास्त गरज पडते. म्हणून तो सावकाराकडे पैसे व्याजाने घेतो. परिश्रमाने मिळालेला सर्व पैसा व्याजाच्या रुपात सावकाराकडे जातो हे बरोबर नाही. 


          सावकाराच्या पाशातुन मुक्त होण्याकरिता, मानवमंदिर सजविण्याकरिता, सत्यकाम निर्माण करण्याकरिता, फंड अनुदान गोळा करणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकाने आपआपले विचार ठेवावे की फंड कसा गोळा करावा. जेणेकरुन तो या गरीब सेवकांच्या उपयोगात येईल. अनुदान त्यावर काही सेवकांनी आपआपले विचार खालीलप्रमाणे प्रदर्शित केले. काही सेवक म्हणाले की, बाबांनी सेवकांना भावना आणि वाईट व्यसनापासून मुक्त केले आहे. आणि सेवकांचा पैसा वाचविला आहे तरी दहा रुपये महिना फंड अनुदान जमा करावे. त्यामुळे मानवी जीवन साधता येईल. काहीजण म्हणाले की, आम्ही दहा रुपये काय पण पाच रुपये महिना पण गोळा करु शकत नाही. त्यावर जबाबदार सेवक म्हणाले की, चार आणे, आठ आणे, एक रुपया याप्रमाणे महिन्याकाठी जमा करावे.

          
                  काही जणांनी हीच रक्कम प्रत्येक आठवड्याला जमा करावी असे विचार ठेवले. सर्वात शेवटी यावर बाबांनी मार्गदर्शन केले की, सेवकांनी आपल्या परिस्थितीनुसार आणि ऐपतीप्रमाणे सर्वांनी फंड अनुदान जमा करावे तसेच मार्ग घेणाऱ्या सेवकांस फंड अनुदान गोळा करावा लागेल आणि प्रत्येक आठवड्यात होणाऱ्या बैठकीला सेवकांनी उपस्थित राहावे. ध्येय धोरणाने वागावे असा आदेश दिला. त्याप्रमाणे सर्व सेवकांनी बाबांच्या आदेशाचे पालन करुन पाच रुपये महिना किंवा सव्वा रुपया हप्ता याप्रमाणे सेवक फंड अनुदानात रकम गोळा करु लागले. या कामाकरिता श्री. रामाजी मौंदेकर आणि श्री. मोतीराम हरडे यांना रकम जमा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले.

परमात्मा एक



No comments

Powered by Blogger.