PARMATMA EK | अभाग्यास भाग्यप्राप्ती
PARMATMA EK | अभाग्यास भाग्यप्राप्ती
![]() |
PARMATMA EK | अभाग्यास भाग्यप्राप्ती |
महानत्यागी बाबा जुमदेवजी प्राप्त केलेल्या परमेश्वरी कृपेचा लाभ अनेक सेवकांनी त्यांची नानातन्हेची दुःखे नष्ट करण्याकरिता घेतला. शारीरिक दुःखाबरोबरच त्यांचे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दुःखही दूर झाले. याशिवाय अनेकांना नानातन्हेचे योग प्राप्त झाले आहेत. बाबा स्वयम् परमेश्वरात विलीन झालेले आहेत. त्यांच्या मुखकमलातुन जे शब्द निघतात त्याचप्रमाणे प्रत्येकाला योग मिळतो आणि आपले भाग्य बनविता येते. अशाच एका अभाग्याने आपले भाग्य या मार्गात येऊन बनविले आहे. त्या अभाग्याचे नाव आहे श्री. हरिभाऊ कुंभारे.
श्री. हरिभाऊ कुंभारे हे जुनी मंगळवारी, नागपूर येथे राहतात. त्यांना दोन पत्नी आहेत. त्यांचे दुर्भाग्य की त्यांचे पहिले लग्न झाल्यावर पुत्रप्राप्ती न झाल्यामुळे त्यांनी दुसरे लग्न केले. पण तेथेही ते अपयशी ठरले. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी खुप प्रयत्न केलेत. पण योग आला नाही. हा कर्मभोगाचा भाग आहे. तेव्हा ते कुटुंबासह महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्याकडे आलेत आणि प्रार्थना करु लागले. तेव्हा बाबांनी त्यांना सांगितले, तुम्ही अभागी आहात. तुम्हाला आमच्या मानव धर्माचा स्वीकार करावा लागेल. तरच तुमचे भाग्य उदयास येईल. त्यावर हरिभाऊंनी बाबांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. बाबांनी संपूर्ण मार्गदर्शन करुन अनेक देवांची पुजा बंद करुन एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानावे लागेल, तसेच कुटुंबात सत्य, मर्यादा, प्रेमाने वागावे लागेल हे सांगून त्यांच्याकडून तसे वचन घेतले. त्यांनी या मार्गात येण्याकरिता करावी लागणारी ४१ दिवसांची साधना सुरु केली. ती साधना पूर्ण करताना त्या काळात पाळावयास काही अटी दिल्यात. साधना पूर्ण झाल्यावर ४२ व्या दिवशी कार्याची समाप्ती करुन हवनकार्य थाटामाटात पार पडले आणि ४३ व्या दिवसापासून बाबा हनुमानर्जीच्या नावाने ते माळ जपू लागला.
साधारणतः चार वर्षानंतर बाबा हनुमानजींनी त्यांच्या स्वप्नात एक साक्षात्कार दाखविला. त्यांना स्वप्नात दिसले की, एक छोटासा बाळ साधारणतः सात आठ महिन्यांचा असलेला रांगत आला आणि त्यांच्या पत्नीचे दुध पिऊन अंगणात खेळावयास गेला. हरिभाऊंनी ही घटना बाबांना समजावून सांगितले. तेव्हा बाबा जुमदेवजींनी सांगितले, परमेश्वराला पुढे काय घडवायचे आहे ते तुम्ही पाहा. सौ. वत्सलाबाई सदावर्ती ही गोळीबार चौक, नागपूर येथे राहते. ती हरिभाऊंची धाकटी बहीण आहे. तिला मुले होत होती पण ती जन्माला आल्यानंतर थोड्याच वेळाने परमेश्वराला प्रिय होत होती. अशा रीतीने तीन मुले मरण पावल्यामुळे त्यांनी मुले जाऊ नयेत म्हणून प्रयत्न केलेत पण दुःख दूर झाले नाही. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मानव धर्माचे पहिले सेवक श्री. गंगारामजी रंभाड हे तिच्या घराजवळ राहत होते. ती त्यांच्या घरी आली आणि आपली हकीकत तिने त्याना सांगितली. या मार्गाबद्दल तिला थोडीफार माहिती होती. तेव्हा त्या सेवकाने तिला बाबा हनुमानाच्या फोटो जवळ अगरबत्ती लावून त्याला आपली मनोकामना सांगायला लावले. पुढे परमेश्वर काय घडवतो ते पाहा असे ते म्हणाले. त्याप्रमाणे तिने कार्य केले "भगवान के पास देर है, अंधेर नहीं या म्हणीप्रमाणे त्या बाईची मनोकामना पूर्ण झाली. तिला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा कसलाही त्रास न होता झालेत. ती तिसऱ्यांदा गरोदर राहिली, परंतु या वेळेस तिला गरोदर असताना खूप त्रास होत होता. तिने डागा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये जाऊन औषधोपचार केलेत पण तेथेही त्रास नाहीसा झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्रास वाढतच गेला. एकवेळ अशी आली की, तिने आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु दोन अपत्ये पोरकी होणार हाही विचार तिच्या मनात आला. असा विचार करीत असताना पुन्हा बाबा हनुमानर्जीची आठवण आली आणि एके दिवशी सकाळीच ती बाई आंघोळ करुन महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निवासस्थानी बाबांना भेटावयास गेली. त्यावेळेस बाबा घरी नव्हते. म्हणून ती बाई बाबा हनुमानजींच्या फोटोसमोर बसली आणि अगरबत्ती लावून तिने भगवंताला विनंती केली की, "भगवंता या गरोदरपणात मला खूप त्रास होत आहे. मला या दुःखातुन मुक्त करा. मला जे अपत्य होईल ते तुझ्या चरणी वाहन देईन. " यावेळी ती या मार्गाची सेविका होती. तिचे दुःख नाहीसे झाले. यावेळेस ती सात महिन्यांची गरोदर होती. तिने भगवंताला अशी विनंती केली ती तिने घरी कोणालाही सांगितली नाही.
वत्सलाबाईची मनोकामना पूर्ण झाली. परमेश्वराने तिचे शब्द ऐकून तिला त्रासातुन मुक्त केले. कारण महानत्यागी बाबा जुमदेवजींनी जी एका भगवंताची प्राप्ती केली आहे ती परमेश्वरी कृपा जागृत आहे. नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिने एका छानशा गोंडस मुलाला जन्म दिला. दिवसेंदिवस वाढत वाढत तो आठ महिन्यांचा झाला. एक दिवस रांगत असताना पायरीवरुन तो खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. खूप औषधोपचार केले पण दुःख दूर होत नव्हते. तेव्हा वत्सलाबाईने आपल्या घरातील लोकांना सांगितले की "हा मुलगा मी भगवंताला वाहून देईन असे त्याला वचन दिले आहे. हा मुलगा आपला नाही. म्हणून त्याला भगवंताच्या चरणी अर्पण करणे हाच एक उपाय आहे. तेव्हाच त्याचे दुःख दूर होईल." तेव्हा घरच्या लोकांनी तिला अडविले. ते तिला म्हणाले, "भगवंताला शब्द दिला म्हणून काय पोटच्या गोळ्याला असे वाहून देतात काय?" परंतु त्या बाईचा निर्धार पक्का होता. तिला नक्की माहित होते की, वाहून दिल्याशिवाय दुःख दूर होणार नाही. तिने घरच्या लोकांना बजावून सांगितले की मी बाबा जुमदेवजीकडे जाते आणि सर्व हकीकत सांगते. ते ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे मी पुढील कार्य करीन, सौ. वत्सलाबाई त्या मुलाला घेऊन बाबा जुमदेवजींच्या निवासस्थानी आली.
बाबांना संपुर्ण हकीकत तिने सांगितली आणि परमेश्वराला दिलेले वचन तिने पूर्ण केले नाही याची चूक कबुल केली. बाबांनी शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि बाबांनी तिला मार्गदर्शन केले की, "बाई हा मुलगा तुझा नाही. तुला असे वचन देण्यास कोणी सांगितले?" ती उत्तरली, "बाबा मला खूप कष्ट होत होते. मी ते सहन करु शकत नव्हते. मला कोणीही सांगितले नाही. मी स्वतःच भगवंताला अंतःकरणापासून दुःख दूर होण्याकरिता वचन दिले." तेव्हा बाबा म्हणाले, "ठीक आहे, तु भगवंताला मुलगा वाहून दे." बाई म्हणाली, "बाबा आपण म्हणाल त्या दिवशी मुलगा वाहनू देईन." त्यावेळी बाबांनी तिला अट घातली की, मी मुलगा दान घेईन पण दोन्ही डोळ्यांत अश्रृंचा एकही थेंब न आणता हसतमुखाने दान द्यावे लागेल. अश्रुचा एक थेंब जरी डोळ्यात दिसला तर मी दान घेणार नाही." त्याप्रमाणे बाईने अट मंजुर केली आणि त्यांनी तिला तिसऱ्या दिवशी सायंकाळी त्या मुलाला घेऊन येण्यास सांगितले. ठरलेला दिवस शनिवार होता. त्या दिवशी १९७० सालची जानेवारी महिन्याची तीस तारीख होती. ठरलेला दिवस उजाडला.
बाबांनी एका सेवकांतर्फे २५, ३० सेवक आणि श्री. हरिभाऊ कुंभारे यांना सहकुटुंब बोलावून घेतले. सायंकाळी ७ वाजता सर्व हजर झाले. सौ. वत्सलाबाई सदावर्ती ही पण आपल्या आठ महिन्यांच्या मुलाला घेऊन वेळेवर आली. भगवंताला सर्वांनी एकतेने प्रणाम केला आणि आनंदाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. सौ. वत्सला बाईने आपल्या मुलाला भगवान बाबा हनुमान जी च्या प्रतिमेसमोर ने झोपवले, अगरबत्ती लावली, कापूर लावला आणि भगवान बाबा हनुमानजीला विनंती केली की, बाबा हनुमानजी मी आपणास वचन दिल्याप्रमाणे आज मुलाला वाहून देत आहे. हा माझा मुलगा नसून तो तुमचा आहे. त्याला आपण स्वीकारावे. असे म्हणून तिने मुलाला वाहून दिले. कापूर विझल्यावर ती उभी झाली. बाबा सारखे तिच्या डोळ्यांकडे बघत होते. त्या बाईने हसतमुखाने त्या मुलाला बाबा जुमदेवजींना दान दिले. तिच्या डोळ्यात अश्रुंचा एक थेंबही आला नाही. त्यावेळी बाबांनी त्या मुलाला घेऊन श्री.हरिभाऊ कुंभारे यांना समोर बोलावून त्या अभाग्याला तो दान दिला.
परमेश्वरी लीला अगाध आहे. त्याला जे घडवायचे होते, ते त्यांनी घडामोडी करुन घडविले. आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्यावेळी हरिभाऊंनी मुलाला आपल्या हातात घेतले त्याचवेळी त्यांनी तो मुलगा आपल्या लहान पत्नीजवळ दिला आणि साक्षात्कार घडला की, त्या बाईने मुलाला हातात घेताच तिच्या स्तनातून दूध बाहेर येऊ लागले. हे तथे जमलेल्या सेवकांनी पाहिले आणि वत्सलाबाईचे दूध आटले गेले. ही भगवंताची लीला पाहून सर्व सेवक आश्चर्यचकित झाले आणि म्हणून बाबांनी प्राप्त केलेल्या एका परमेश्वराची कृपा जागृत आहे. विशेष सांगायचे म्हटल्यास या दान दिलेल्या मुलाचा चेहरा वत्सलाबाईच्या दोन मुलांच्या चेहऱ्यापेक्षा वेगळा आहे. वत्सलाबाईंची दोन मुले तिच्या चेहऱ्यावर असून हा तिसरा मुलगा हरिभाऊंच्या चेहऱ्यावर आहे. धन्य तो परमेश्वर.
अशाप्रकारे बाबांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सेवकांची इच्छा परिपूर्ण होऊन त्याला त्याच्या जीवनात समाधान लाभते. परंतु त्याकरिता एका परमेश्वराला समोर ठेवून मानवतेचे कार्य केले पाहिजे म्हणजे या कलियुगात सुध्दा सत्ययुगाचा लवलेश आहे हे वरील गोष्टीवरुन सिद्ध होते. अशाप्रकारे या मार्गात अभाग्यास भाग्य लाभते हे सिध्द झाले आहे.

Leave a Comment