PARMATMA EK- दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, सालईमेटा


              दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, सालईमेटा

PARMATMA EK- दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, सालईमेटा
PARMATMA EK- दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, सालईमेटा

              १९७६ साली परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँकचा व्यवहार चालु झाला. त्याची मर्यादा संपूर्ण नागपूर जिल्हा असल्यामुळे त्या बँकेचा फायदा घेऊन नागपूर जिल्ह्यातील राहत असलेल्या काही खेड्यातील सेवकांनी जोडपंदा म्हणून काहीतरी योजना राबवावी असे मनाशी ठरवून त्यांनी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली.


                 १९७८ साली एके दिवशी श्री. गडीरामजी डोनारकर यांच्यासोबत यादोराव गावंडे, मराठी दिवटे, फकीरचंद भिवगडे इत्यादी १०-१५ सेवक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या भेटीला आलेत. ते नागपूर जिल्ह्यात रामटेक तहसिलीत होणाऱ्या सालईमेटा, आसोली, भंडारबोडी, कथलाबोडी, धर्मापुरी या गावांत राहणारे होते. हा भाग डोंगराच्या जवळपास असल्यामुळे आणि तेथील जमीन कोरडवाहू असल्यामुळे नागपूर जिल्ह्यात हा भाग मागासलेला भाग म्हणून गणला जातो. या भागतील रहिवासी लोक बरेच आदिवासी आहेत. ते बाबांना विनंती करुन म्हणाले की, बाबा आमच्या भागात महादुला, शिवानी येथे दुध डेअरी आहे. परंतु आम्हाला पेमेंट वेळेवर मिळत नाही. आमच्यापैकी कितीतरी लोकांचे पैसे पचलेत. त्यामुळे आमची गळचेपी झाली. अशाप्रकारे आम्हाला व्यावहारीक त्रास आहे. म्हणून आपण आमच्या भागात मागासलेल्या शेतकरी वर्गाला पूरक असा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय (दुध डेअरी) सुरु करुन द्यावा आणि सेवकांचे जीवनमान उंच करावे.l

              बाबांनी ज्याप्रमाणे या सेवकांचे शारीरिक, मानसिक दुःख दूर करुन त्यांना सुख समाधान दिले त्याचप्रमाणे त्यांचे जीवनमान उंच आणण्याकरिता आर्थिक लाभ मिळावा म्हणून त्यांनी वरील विनंतीला होकार दिला. त्यामागे बाबांचा उद्देश एकच होता की, व्यवहारात सत्यता आणावी. सत्याशिवाय श्रमजीवी लोकांना न्याय मिळणार नाही. म्हणून बाबांनी दुध डेअरीची स्थापना करुप श्रीयुत गडीरामजी डोनारकर यांना प्रमुख प्रवर्तक बनविले आणि एक समिती तयार केली. तसेच ३१ सेवकांकडून ६१० रु. भाग भांडवल जमा करुन जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, उमरेड यांच्याशी पत्रव्यवहार करुन "परमात्मा एक सेवक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादीत, सालईमेटा" या नावाने त्यांच्या पत्र क्रमांक ए.आर.यु./ए.जी.आर.आय./२५९/७८ दि.२२/६/१९७८ रोजी नोंदणी करण्यात आली. 


       एक ऑक्टोबर १९७८ रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शुभ हस्ते या मार्गाचे सेवक आणि विदर्भ विणकर सहकारी संस्था, नागपूरचे अध्यक्ष श्री. सोमाजी बुरडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनाचा सोहळा पार पडला आणि डेअरीच्या कार्याला रीतसरपणे सुरुवात झाली. या पहिल्याच दिवशी १५० लिटर दुध संकलित करण्यात आले. लोकांना दुधाचे पैसे हप्तेवारीने बरोबर मिळू लागले. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला.


                डिसेंबर १९७८ साली या भागातील २७ सेवकांना कमकुवत गट म्हणून परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक, नागपूर येथून पंच्यात्तर हजार रुपयांच्या म्हशी वाटण्यात आल्यात त्यामुळे या भागातील लोकांना आणखी जास्त उत्पन्नाे साधन प्राप्त झाल्यामुळे या दुध संस्थेची खुप भरभराट झाली. परंतु सरकारी दुध योजनेमधील जे कर्मचारी दुध तपासून मिल्क स्कीममध्ये नेत होते त्या लोकांनी दुध डेअरीला खुप त्रास दिला. बाबांनी हे सर्व सहन केले. परंतु काही दिवसानंतर बाबांनी त्या कर्मचाऱ्यांना विचारले की यामागील आपला उद्देश कोणता? सत्य व्यवहार असून आपणांस चांगल्या प्रतीचे दुध मिळते आणि असे असुनही ग्रेडच्या खाली दुध आहे म्हणून दुध टाकून देता. तेव्हा मॅनेजर आणि दुध उत्पादक यांनी बाबांना सांगितले की, आपण शिकविल्याप्रमाणे आम्ही सत्य व्यवहार केला आणि यांना लाचलुचपत दिली नाही म्हणून ८o0-९०० लिटर दुध टाकुन दिले. हे ऐकुन बाबांना खुप दुःख झाले. तेव्हा त्याच दिवशी बाबांनी त्या दुध उत्पादकांना ते संपुर्ण दुध फुकटात वाटून दिले आणि त्यांना दही, तुप, लोणी तयार करुन त्याचा उपभोग घ्यावयास सांगितले. अशा रीतीने संस्थेवे जरी नुकसान झाले तरी त्यापुढे हे सरकारी कर्मचारी लज्जित होऊन सुधारलीत आणि त्यांनी त्यापुढील व्यवहार सुरळीत केला.


              या डेअरीकरिता मानव धर्म या मार्गातील सेवक श्री. सदाशिवराव तुपे यांनी आपल्या जागेपैकी ५० ५० फुटाची जागा दान दिली. कारण ते या मार्गाचे सेवक होण्याअगोदर खुप कष्टी होते. ते भावनेच्या आहारी गेलेले होते. या दुःखामुळे अनेक देवदेवतांचे विसर्जन करुन ते या मार्गात आले. त्यांना समाधान लाभले. त्यामुळे त्यांनी दान देताना काहीही मोह न ठेवता आपली संस्था आहे असे समजून दान केले. परंतु महानत्यागी बाबा जुमदेवजींनी त्यांच्या संस्थेत आमरण चौकीदाराची नोकरी देऊन त्यांनी केलेल्या दानाची आणि उदार भावनेची बाबांनी कदर केली आणि त्यांनी ती चौकीदारी मोठ्या आनंदाने स्वीकारली.

           या संस्थेची इतकी जोरदार भरभराट झाली की अवघ्या सहा महिन्यांत म्हणजे मार्च १९७९ साली संस्थेने स्वतःची विहीर बांधुन कर्मचारी निवासस्थानही बांधले. इतकेच नव्हेतर कडबा कटर मशीन आणि आटाचक्कीही जोडधंदा म्हणून सुरु केली. १९८० साली आरे कॉलनी, मुंबई येथील सरकारी योजनेप्रमाणे १०८ म्हशींची पारडी आणून दुध उत्पादक सभासदांना बाबांच्या हस्ते वाटण्यात आलीत. १९८१ साली दुध उत्पादकांच्या जनावरांकरिता पशुखाद्य माफक दरात पुरविण्याच्या उद्देशाने संस्थेने पशुखाद्य खरेदीविक्रीचा व्यवसाय सुरु केला. मशीनवर कडबा कटर माफक दरात करुन दिल्यामुळे उत्पादकांकडील कडव्याची नासधुस थांबविण्यात यश प्राप्त केले. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास या संस्थेने केलेले जनसेवेचे कार्य असल्यामुळे शासनाने जिल्हा दुध विकास खात्यामार्फत १५ हजार रुपयांचे ५० टक्के अनुदानावर कडबा कटर मशीन संस्थेला दिले.
या संस्थेने दुध उत्पादकांना शेतीकरिता लागणाऱ्या रासायनिक खतांच्या खरेदीविक्रीचा व्यवसाय १९८५/८६ मध्ये सुरु करुन दुध उत्पादकांना होणाऱ्या त्रासातुन मुक्त केले आणि त्यांच्या वेळेचीही बचत केली. १९८६/८७ साली संस्थेचा कार्यव्याप वाढल्यामुळे जागा अपुरी पडली म्हणून संस्थेने कार्यालयासाठी पक्की इमारत तयार केली. या संस्थेची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती पाहून महाराष्ट्र शासनाने १९८८-८९ या साली ७५ टक्के अनुदानावर २८ हजार रुपयांचे मिल्को टेस्टर (फॅट परीक्षण मशीन) दिले.


अशाप्रकारे या संस्थेने महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनाने उत्तरोत्तर प्रगती करुन आपले नाव महाराष्ट्र शासनाजवळ उज्ज्वल केले आहे. याचे संपूर्ण श्रेय महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनाच आहे. याबद्दल या भागातील सेवक बाबांचे ऋणी आहेत.





No comments

Powered by Blogger.