PARMATMA EK- परमात्मा एक सेवक मानव मंदिर
परमात्मा एक सेवक मानव मंदिर
![]() |
| PARMATMA EK- परमात्मा एक सेवक मानव मंदिर |
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी परमेश्वरप्राप्ती केल्यानंतर आध्यात्मिक ज्ञानाने सेवकंचे शारीरिक दुःख नष्ट करुन त्यांना आर्थिक लाभ व्हावा या दृष्टीने सहकारी बँक आणि दुध उत्पादक संस्था स्थापन केल्या. त्यांचा लाभ सेवकांना मिळाल्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्याचे सामाजिक कार्य बाबांनी केले. बाबांनी "मानव धर्म" स्थापन केल्यावर मानवाला त्याची प्रचिती यावी म्हणून मानव मंदिर असणे आवश्यक आहे असे त्यांना वाटु लागले. म्हणून सर्वप्रथम त्यांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर ही धर्मादाय संस्था स्थापन केली. वरील संस्थेमार्फत या मार्गाचा प्रगटदिन दरवर्षी सेवक साजरा करतात. तसेच मंडळाच्या सभासदांकरिता, मानव जागृतीचे कार्य करण्याकरिता, बाहेर गावांतील सेवकांना आराम करण्याकरिता, बाहेर गावच्या सेवकांच्या मुलांना उच्च शिक्षणाकरिता राहण्यासाठी वसतीगृह तसेच इतर सामाजिक कार्य आणि मंडळातर्फे वेळोवेळी होणारे इतर कार्य याकरिता स्वतःची भव्य वास्तु असावी अशी सेवकांची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती.
तसेच दरवर्षी मानव जागृतीच्या कार्याकरिता नेहमी सेवकांना मोठ्या प्रमाणात जागा घेऊन कार्यक्रम राबवावे लागत असत. या मार्गात दिवसेंदिवस समाविष्ट होणार्या सेवकांची संख्या लक्षात घेता आणि संघटनेच्या दृष्टिकोनातुन कोणतीही जागा भाड्याने घेतली तरी ती अपुरी पडत असे म्हणून मंडळाची स्वतःची भव्य वास्तु असावी, जेणेकरुन दरवर्षी इतर भवन भाड्याने घेतल्याने सेवकांवर जो भुर्दंड पडतो तो वाचेल आणि त्याच पैशात स्वतःचे भवन निर्माण होईल या उद्देशाने आणि खरोखरच ते भवन मानव मंदिरासारखे बांधावे असा विचार सेवकांच्या १५ फेब्रुवारी १९८० रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. सेवकांनी बाबांना याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता विनंती केली.
सेवकांच्या विनंतीनुसार बाबांनी बैठकीला मार्गदर्शन करताना सांगितले की आपण मांडलेले विचार योग्य आहेत. परंतु पैसा भरपुर लागेल. त्या दृष्टिकानातुन सेवकांनी आर्थिक मदत करण्याची इच्छा ठेवावी आणि याकरिता साधारणतः वीस हजार चौरस फुट असलेली जागा नागपूर शहरात शोधावी. या वेळेस या धर्माचे दोन हजार कुटुंब सेवक होते. बाबा पुढे म्हणाले, सेवकांनी मानव मंदिराची आवश्यकता लक्षात घेऊन आतापासून दान देण्यास सुरुवात करावी. त्याप्रमाणे पहिले दान १,००१ रु. चे श्रीमती नागाबाई किसन धापडे हिने २८/२/१९८० ला दिले.
भावना करिता लागणाऱ्या जागेकरिता या मंडळाचे अध्यक्ष श्री. महादेवराव कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ नागपूर सुधार प्रन्यासच्या कमिश्नरांना १४ सप्टेंबर १९८२ ला भेटले. वर्धमान नगर, नागपूर येथील स्मॉल फॅक्टरी एरिया या भागामध्ये धर्मादाय संस्थेकरता राखून ठेवलेल्या जागेबद्दल शिष्टमंडळाने कमिश्नरांशी चर्चा केली. या ठिकाणी विणकर समाजाचे श्री. हेडावू, मुख्य कार्यकारी अभियंता कार्यरत होते. त्यांना महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि या संस्थेबद्दल संपूर्ण माहिती होती. म्हणून त्यांनी तेथील कमिश्नरसाहेबांना या संस्थेची संपूर्ण माहिती देऊन सांगितले की ही संस्था फार मोठी असून तिच्या संस्थापकांना परमेश्वरी कृपा प्राप्त झाली असून ते मानव जागृतीचे कार्य सतत निष्काम भावनेने करीत असतात. ते स्वतः त्यागी आहेत. त्या संस्थेची चार प्लॉटस्ची मागणी आहे. तरी आपण त्यांना सुधार प्रन्यासची जागा देण्यास हरकत नाही, इतकेच नव्हे तर, त्यांनी या संस्थेला जागा मिळवून देण्यासाठी खुप प्रयत्न केले आणि त्याकरिता कमिश्नरांच्या मनात सद्भावना निर्माण केली. त्याप्रमाणे नागपूर सुधार प्रन्यासच्या पत्र क्र. ८९८० दि. ६ जानेवारी १९८४ रोजी निघालेल्या पत्राप्रमाणे वर्धमान नगर येथील स्मॉल इंडस्ट्रीज एरिया या भागातील प्लॉट नं.५० सी ते ५० एफ अशी २०,७६७ चौ. फुट असलेली जागा मंडळाला देण्याबाबत पत्र क्र. ६३७९ दि. १७ फेब्रुवारी १९८४ नुसार २४ फेब्रुवारी १९८४ रोजी जागेचा ताबा मंडळाला मिळाला.
या जागेची किंमत फक्त ४ रु. फुटाप्रमाणे लावली आणि ही जागा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर या नावावर रजिस्टर करण्यात आली. या वेळेपर्यंत बऱ्याच सेवकांनी भवननिधी म्हूणन १,00१ रु. चे दान दिले होते. या काळात महानत्यागी बाबा जुमदेवजी स्वतः भवननिधीकरिता दान गोळा करण्यासाठी काही सेवकांबरोबर गावोगावी दौऱ्यावर गेले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने सेवकांना जागृत केले. मानव मंदिर बांधण्याकरिता प्रत्येक सेवकांच्या कुटुंबातून निदान १,००१ रु. दान करावे असे सांगितले. बाबांच्या या आदेशाला प्रत्येक सेवकाने अत्यंत उत्साहाने साथ दिली आणि हळुहळू रकम गोळा होऊ लागली. बाबांचे सर्व सेवक गरीब आहेत. बाबांची इच्छा अशी होती की, या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात जर भवने बांधलेली आहेत ती सर्व श्रीमंत लोकांची आहेत. परंतु गरीब, कष्टकरी, हातमजुरी करणाऱ्या लोकांचे भवन नाही. म्हणून त्यांना या देशाला दाखवून द्यायचे होते की, गरीब सुध्दा श्रीमंतापेक्षा चांगले कार्य करु शकतात. म्हणून गरीबांचीसुध्दा इज्जत करावी. आणि त्यांना मानवासारखे वागावावयास पाहिजे. त्यांना समाजाने तुच्छ समजू नसे. त्याचप्रमाणे हे भवन सेवकांच्याच पैशातुन उभे व्हावे अशी बाबांची इच्छा होती. तसेच त्यांचे म्हणणे असे होते की, या देशात श्रीमंतांच्या हातात सत्ता आहे आणि बाबांच्या पाठीशी गोरगरीब सेवक आहेत, म्हणून गोरगरिबांच्या हातात या संस्थेची सत्ता राहावी, ती श्रीमंतांच्या हातात जाऊ नये. या संस्थेमार्फत स्थापन करण्यात आलेल्या बँकेत अनेक धनिक लोक येत होते आणि ते बाबांजवळ भवननिर्मितीकरिता पैसे देण्याची इच्छा व्यक्त करीत होते. तरी बाबा त्यांच्या इच्छेला नम्रपणे नकार देत होते. अशाप्रकारे धनिक लोकांकडून दान घेण्याचे त्यांनी टाळले.
मानव मंदिराकरिता जागा मिळाल्यावर भवनाचे आर्किटेक्ट म्हणून प्रसिद्ध आर्किटेक्चर श्री. व्ही.डी. पुसदकर यांची नेमणुक करण्यात आली. त्यानंतर तेथे विहीर आणि कंपाऊंडची) आवार ची भिंत घालण्याकरिता कोटेशन मागविण्यात आले आणि दिनांक १४ एप्रिल १९८४ रोजी कोटेशन उघडण्यात आले. कमी दरात कोटेशन श्री. अशोक नंदनवार यांचे असल्यामुळे आणि त्यातही ३.५-टक्के सुट दिल्यामुळे ते काम त्यांना देण्यात येऊन दिनांक १५ एप्रिल १९८४ रोजी विहीरीच्या जागेचे भुमीपुजन श्री. नेमाजी मौदेकर, उपाध्यक्ष, परमात्मा एक सेवक नागरिक सह. बँक, नागपूर यांच्या शुभहस्ते झाले आणि त्याच दिवशी कामाला सुरुवात झाली. त्यानंतर भवनाचा नकाशा काठून २२ लाखांचे एस्टिमेट श्री. पुसदकर यांच्याकडून तयार करण्यात आले. १५ नोव्हेंबर १९८४ ते २४ नोव्हेंबर १९८४ पर्यंत इमारतीकरिता कोटेशन मागवून २६ नोव्हेंबर १९८४ रोजी कोटेशन उघडण्यात आले असता कमी दर असलेले कोटेशन श्री. अशोक नंदनवार यांचे होते. नकाशा काढताना श्री. पुसदकर साहेबांनी बाबांना भवन कसे बांधावयाचे हे विचारले असता बाबांनी त्यांना सांगितले की, मानव मंदिर असे बांधावे जेणेकरुन या मानवमंदिरात प्रवेश करणारा प्रत्येकजण प्रसन्न झाला पाहिजे. कोटेशन उघडले तेव्हा मंडळाजवळ फक्त चार लाख रुपये जमा होते. या चार लाख रुपयांत भवनाचे बांधकाम सुरु केल्यास आणि २२ लाख रुपये बांधकाम सुरु असताना गोळा झाले नाहीत तर भवन तयार होणार नाही याची काळजी बाबांना होती. पैसे गोळा झाले नाहीत तर नुकसान भरपाई करिता बिल्डर क्लेम करतील म्हणून कोटेशन रद्द करुन जोपर्यंत बांधकामाला लागणारा पैसा गोळा होत नाही तोपर्यंत बांधकाम करण्याचे स्थगित ठेवावे असा आदेश बाबांनी मंडळाला दिला. श्री. अशोक नंदनवारचे कमी दर असलेले कोटेशन होते तरी त्यात ३ टक्के सुट देण्यास बाबांनी सांगितले आणि मंडळाने त्या अर्जावर विचारविनिमय करुन दि. ५ डिसेंबर १९८४ रोजी इमारत बांधण्याचे काम दिले.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून अन्न व नागरी पुरवठा विभाग, नागपूरतर्फे ३.९१० पोते सिमेंटचा परवाना घेण्यात आला आणि स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे ५५ टन लोखंड मिळविण्यात आले. त्यानंतर जागेचे भुमिपुजन दिनांक १६ डिसेंबर १९८४ ला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. मनो ठुब्रीकर, एसोसिएट प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सर्जरी, व्हर्जिनिया मेडिकल सेंटर, व्हर्जिनिया (अमेरिका) यु.एस.ए. यांच्या करकमलांव्दारे झाले. त्याच दिवशी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. भवनाची इमारत बांधण्याचे काम जवळ-जवळ दोन वर्ष सुरु होते. या काळात बाबांनी सर्व सेवकांना गावोगावी असा आदेश दिला की, प्रत्येक सेवकाने १००१ रु. कमीतकमी आणि शक्तीप्रमाणे २,००१, ५,००१ रुपये आणि ज्यांची तीव्र इच्छा असेल त्यांनी दहा हजार एक रुपये भवन निधी दान द्यावा.
बाबांनी हा निधी गोळा करण्याकरिता अनेक महिने सतत खेडोपाडी दौरा केला. बाबांबरोबर नेहमी पाच सहा सेवक राहत होते. बाबा आपल्या गावात येत आहेत हे सेवकाना माहित होताच ते सर्वजण एकत्र येत असत. बाबांच्या आदेशांचे हसतमुखाने पालन करीत असत. हा दौरा बाबांनी सायकल, बैलगाडी, मोटार जसा जमेल तसा ऊन, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता केला. तसे बांधकाम सुरु असताना ते स्वतः जातीने बांधकामात लक्ष देत होते. कारण ते सुध्दा कॉन्ट्रॅक्टर होते. निधी नाही आणि श्री. अशोक नंदनवार यांनी सुध्दा पैसे वेळेवर मिळाले नाहीत म्हणून बांधकामात खंड पडू दिला नाही.
अशाप्रकारे या संपूर्ण इमारतीचे बांधकाम जवळजवळ २६ लाख ७० हजार रुपयांचे झाले आणि मानव मंदिराची भव्य वास्तु गरिबांच्या कष्टाच्या पैशातुन उभी झाली. या भवनाचे वास्तुपुजन २५ नोव्हेंबर १९८६ रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शुभ करकमलांव्दारे करण्यात आले. कारण या वर्षी (१९८६ साली) प्रगट दिन २५ ऑगस्ट १९८६ रोजी साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून तीन महिन्यानंतर या वास्तुचे पुजन करण्यात आले. कारण बाबांनी असे मार्गदर्शन केले की, बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतरच विदेह (निराकार) अवस्थेतुन तीन महिन्यानंतर गृहस्थीमध्ये प्रवेश केला. त्या कारणाने या भवनात प्रगट दिन साजरा केल्यानंतर तीन महिन्यांनी प्रवेश करावयाचा. प्रत्येक वर्षी प्रगट दिन १५ ऑगस्टला वार्षिक हवन करुन १५ नोव्हेंबर सामुहीक हवन कार्य भवनात करण्यात येते.
अशी ही गोरगरीबांची संपुर्ण जगात नसलेली आगळीवेगळी मानव मंदिरावी भव्य इमारत थाटाने उभी आहे. या इमारतीमध्ये आत शिरल्यास खरोखरच मनाला शांती मिळते. याच ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांकरिता व उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेर गावांतील सेवकांच्या मुलांकरिता वसतिगृहही तयार केलेले आहे. त्यांना शिक्षणात मदत मिळावी म्हणून वाचनालयही सुरु करण्यात आलेले आहे. इतकेच नव्हे तर त्या मुलांची प्रकृती सुदृढ राहावी या दृष्टीने पुरविण्यात येते. या गोष्टींचा लाभ इतर सेवकसुध्दा घेत असतात.
या भवनात प्रत्येक वर्षी वेळोवेळी मानव जागृतीवर चर्चासत्र सुरु असते. दरवर्षी १५ नोव्हेंबरला होणान्या हवनकार्याला ७ ते १० हजार सेवक उपस्थित असतात. प्रत्येक कुटुंबातील सेवक घरुन भोजनाचे डबे आणतात आणि हवनकार्य व बाबांचे मार्गदर्शन झाल्यावर सामुहीक रीतीने भोजनास बसतात. अशाप्रकारे सर्वजण सामुदायिक आनंद उपभोगतात.

नमस्कार
ReplyDeleteनमस्कार जी
ReplyDelete